दुबई एअर शो मध्ये वायुसेनेचे तेजस फायटर जेट चा भीषण अपघात
Tejas fighter jet crashes at Dubai Air Show; pilot dies
दुबईतील अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित दुबई एअर शो मध्ये शुक्रवारी दुपारी भारतीय वायुसेनेचे तेजस फायटर जेट प्रात्यक्षिक उड्डाणादरम्यान कोसळून जळून खाक झाले.
या भीषण अपघातात पायलटचा मृत्यू झाला असून भारतीय वायुसेनेने याची अधिकृत पुष्टी केली आहे. अचानक उठलेल्या काळ्या धुराच्या ढगामुळे काही क्षणासाठी परिसरात खळबळ उडाली.
भारतीय वायुसेनेने निवेदनात सांगितले, दुबई एअर शोमध्ये हवाई प्रात्यक्षिकादरम्यान IAF चे तेजस विमान अपघातग्रस्त झाले. या दुर्घटनेत पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भारतीय वायुसेनेने अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीची स्थापना केली आहे.
दोन वर्षांत ही तेजसची दुसरी दुर्घटना
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)ने बनवलेले हे एक-सीटर लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) सुमारे दुपारी 2.10 वाजता कोसळले. प्रत्यक्षदर्शी च्या माहितीनुसार, प्रात्यक्षिकादरम्यान विमानाने घेतलेल्या नेगेटिव्ह जी-फोर्स टर्नमधून पायलट सावरू शकला नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दुबई एअर शो हे जगातील सर्वात मोठ्या विमान प्रदर्शनांपैकी एक असून याच आठवड्यात Emirates आणि FlyDubai यांनी बहुमूल्य विमान खरेदी करार जाहीर केले होते. अशा भव्य कार्यक्रमाच्या दरम्यान झालेल्या या अपघाताने सर्वांचे लक्ष वेधले.
गेल्या दोन वर्षांत ही तेजसची दुसरी दुर्घटना आहे. मार्च 2024 मध्ये राजस्थानातील जैसलमेरमध्ये तेजसचे पहिले अपघात नोंदवले गेले होते, मात्र त्यावेळी पायलट सुरक्षित बाहेर पडला होता.
4.5 जनरेशनचे हे हलके, चपळ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज विमान हवाई संरक्षण, ग्राऊंड अटॅक आणि क्लोज कॉम्बॅटसाठी ओळखले जाते. भारतीय तंत्रज्ञानाची ही मोठी कामगिरी असलेल्या तेजसला झालेल्या या अपघाताने संरक्षण क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.





